आषाढी एकादशीनिमित्त उमेश्वर विद्यालयात भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात
आषाढी एकादशीनिमित्त उमेश्वर विद्यालयात भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात
सिंगनूर (ता. रावेर) प्रतिनिधी : सिंगनूरजवळील दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालय व उमेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
दिंडीत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भगवान विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई आणि संत मीराबाई यांच्या वेशभूषा साकारून वारकरी परंपरेचा सुंदर आविष्कार घडविला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम" नामघोषात दिंडी मार्गस्थ झाली.
यावेळी आकर्षक पालखीत ग्रंथ तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अभंग गायन केले, तसेच पावल्या आणि फुगड्यांच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. शिक्षक व शिक्षिकांनीही वारकरी वेश परिधान करून दिंडीत उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन राजेंद्र महाजन, सचिव दत्तात्रय चौधरी, सहसचिव संजय महाजन, संचालक नारायण महाजन, शंकर महाजन, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. महाजन आणि पर्यवेक्षक आर. एल. तायडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सांस्कृतिक विभाग प्रमुख भूषण पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत