Contact Banner

यावल–फैजपूर मार्गावर पिकअप पलटी; टायर फुटल्याने भीषण अपघात, ११ बालकांसह २२ मजूर जखमी

 






यावल–फैजपूर मार्गावर पिकअप पलटी; टायर फुटल्याने भीषण अपघात, ११ बालकांसह २२ मजूर जखमी

यावल | प्रतिनिधी

अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील यावल–फैजपूर मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ११ अल्पवयीन मुलांसह २२ मजूर जखमी झाले. शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले. जखमींमध्ये अनेकांच्या हात-पायांना गंभीर दुखापत व फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.






मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथून एमएच-४३ बीबी-१२६४ क्रमांकाचे पिकअप वाहन मजुरांना घेऊन यावल तालुक्यातील न्हावी परिसरातील शेतात कामासाठी जात होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास सांगवी–हिंगोणा दरम्यान वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्यावर उलटले. अपघात इतका भीषण होता की वाहनातील मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून '१०८' रुग्णवाहिकेच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी तत्काळ उपचार सुरू केले. अनेकांना हात-पायांचे फ्रॅक्चर तसेच इतर गंभीर दुखापती झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर रुग्णालयात जखमींच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.

जखमींमध्ये ११ प्रौढ मजूर आणि ११ अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश असून सर्वजण शेतमजुरीसाठी जात होते. प्राथमिक तपासात वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेले जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, अपघाताचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.