बापरे बाप! महिलेच्या पोटातून निघाली तब्बल साडेनऊ किलोची गाठ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया
बापरे बाप! महिलेच्या पोटातून निघाली तब्बल साडेनऊ किलोची गाठ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ५७ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढून तिचे प्राण वाचवले. अत्यंत जटिल समजली जाणारी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने संबंधित महिलेची प्रकृती आता उत्तम असून तिला नवजीवन मिळाले आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भिली येथील ५७ वर्षीय महिलेला गेल्या तीन महिन्यांपासून सतत पोटदुखी, पोटाचा आकार वाढणे तसेच दैनंदिन हालचाली करताना त्रास होत होता. सुरुवातीला सामान्य उपचार करूनही आराम न मिळाल्याने तिला पुढील तपासणीसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी महिलेची सविस्तर तपासणी केली. सीटी स्कॅनमध्ये गर्भपिशवीच्या डाव्या बाजूच्या अंडाशयावर (लेफ्ट ओव्हरी) मोठ्या आकाराचा ट्युमर असल्याचे निदान झाले. गाठीमुळे आतड्यांवर मोठा दबाव येत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. चैतन्य पाटील यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने ओपन ट्युमर एक्सिशन शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून तब्बल ९.५ किलो वजनाची गाठ सुरक्षितपणे बाहेर काढली. गाठीचा प्रचंड आकार आणि महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ असलेले स्थान लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र डॉक्टरांच्या अनुभवामुळे आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे ती कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरीत्या पार पडली.
शस्त्रक्रियेनंतर महिलेला अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. डॉ. आदित्य पाटील, डॉ. अनुष्का साने, डॉ. प्रणव शेवाळे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. सोनाली आणि परिचारिका यांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. अवघ्या तीन दिवसांत तिच्या पोटदुखीत मोठा आराम मिळाला असून ती आता व्यवस्थित चालणे-फिरणे आणि आहार घेणे सुरू केले आहे.
डॉक्टरांचा सल्ला
यावेळी शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी सांगितले की, "अंडाशयावरील गाठी सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता हळूहळू वाढू शकतात. त्यामुळे पोट सतत फुगणे, पोटदुखी, भूक कमी लागणे किंवा वजनात बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास अशा आजारांवर प्रभावी उपचार शक्य होतात. या रुग्णाच्या बाबतीत गाठ मोठी असली तरी योग्य नियोजन, अनुभवी शल्यचिकित्सकांचे कौशल्य आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली." :::




कोणत्याही टिप्पण्या नाहीत