अजिंठा चौफुलीजवळ भरधाव टँकरची मोटरसायकलला धडक; भाजीपाला विक्रीसाठी निघालेल्या महिलेचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी
अजिंठा चौफुलीजवळ भरधाव टँकरची मोटरसायकलला धडक; भाजीपाला विक्रीसाठी निघालेल्या महिलेचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी
जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीसमोरील दिल्ली दरबारी हॉटेलजवळ आज भीषण अपघात झाला. भरधाव टँकरने मोटरसायकलला धडक दिल्याने भाजीपाला विक्रीसाठी निघालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला अर्जुन माळी व भरत माळी हे दोघे मोटरसायकलने पिंप्राळा येथील बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात होते. अजिंठा चौफुलीसमोरील दिल्ली दरबारी हॉटेलजवळ भरधाव टँकरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात मंगला अर्जुन माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी भरत माळी राहणार जळगाव यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकात त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आणि खड्ड्यांमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे. खराब रस्त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
मयत मंगला अर्जुन माळी या सावदा येथील ओम कॉलनीतील रहिवासी भाजीपाला विक्रेते धनराज माळी व चेतन माळी यांच्या त्या सासूबाई होत. त्यांच्या निधनाने सावदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत