सावदा हादरले! बामणोद येथे विहिरीत पडून ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू
बामणोद येथे विहिरीत डोकावताना पाय घसरून सावदा येथिल ३८ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू; फैजपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
यावल | प्रतिनिधी :
यावल तालुक्यातील बामणोद येथे विहिरीत डोकावत असताना तोल जाऊन एका ३८ वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने महिलेला विहिरीतून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती धनराज बेंडाळे (वय ३८), रा. सावदा, ता. रावेर या बामणोद येथे आल्या होत्या. त्या एका विहिरीत डोकावत असताना अचानक त्यांचा तोल गेला व पाय घसरल्याने त्या थेट विहिरीतील पाण्यात पडल्या. पोहता न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या.
घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे सावदा व बामणोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत