चार वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेले; प्रौढाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा
चार वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेले; प्रौढाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा
भुसावळ | प्रतिनिधी-
तालुक्यातील ग्रामीण भागात साडेचार वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता चिमुकली घरासमोरील अंगणात एका लहान मुलासोबत खेळत होती. त्यावेळी तिची आई घरकाम करत होती. काही वेळाने आईने अंगणात पाहिले असता संशयित व्यक्ती चिमुकलीशी बोलताना दिसली.
सुमारे अर्ध्या तासाने आई मुलीला पाहण्यासाठी अंगणात गेली असता मुलगी तेथे दिसून आली नाही. त्यामुळे तिने परिसरात मुलीचा शोध सुरू केला. जवळील दुकानांमध्ये चौकशी केली असता एका दुकानदाराने संबंधित व्यक्ती मुलीला सोबत घेऊन जाताना पाहिल्याचे सांगितले.
त्यानंतर आईने संबंधित व्यक्तीचे घर गाठले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर घरात प्रवेश केल्यानंतर चिमुकली एका कोपऱ्यात बसून जेवताना आढळली.
आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, या प्रकरणातील अन्य बाबींचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी प्रशांत दरेकर करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत