भारतमाता वंदन कार्यक्रमात ‘कीर्तीकाव्यसरिता’चे प्रकाशन
भारतमाता वंदन कार्यक्रमात ‘कीर्तीकाव्यसरिता’चे प्रकाशन
सावदा येथील श्री यमुनेश्वर महादेव मंदिरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज सावदा : ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावदा येथील श्री यमुनेश्वर महादेव मंदिरात पूर्णवाद युवा फोरम, पूर्ण कन्या प्रतिष्ठान व अभिजित ओवे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत माता वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कवयित्री डॉ. किर्ती लोखंडे यांच्या ‘कीर्तीकाव्यसरिता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा खारे यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली असली, तरी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याची मूल्ये जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर भर द्यावा
भारत पूजन व वंदन प्रमुख पाहुणे सचिन सकळकळे सर आणि कवयित्री डॉ. किर्ती लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सचिन सकळकळे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुण व मार्कांच्या मागे न लागता विविध कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
डॉ. किर्ती लोखंडे यांनी सप्तसुखांमध्ये आरोग्यसंपदेचे महत्त्व तसेच शरीरातील पंचतत्त्वांचे संतुलन कसे राखावे, याविषयी कवितेच्या माध्यमातून प्रभावी मांडणी केली.
‘कीर्तीकाव्यसरिता’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कार्यक्रमात डॉ. किर्ती लोखंडे यांच्या ‘कीर्तीकाव्यसरिता’ या काव्यसंग्रहाचे सचिन सकळकळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना, शाळांना तसेच वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असून, एकाच वेळी पाचपेक्षा अधिक पुस्तके खरेदी करणाऱ्यांना अर्ध्या किमतीत पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुस्तकासाठी डॉ. किर्ती लोखंडे यांच्याशी ९१४५०६६४४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यक्रमास शीतल अकोले, टीना खारे, संजय खारे यांच्यासह पूर्णवादी परिवारातील सदस्य, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भारतमाता वंदन कार्यक्रमाला विशेष रंगत आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत