Contact Banner

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा



रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा

लेवाजगत न्युज मुक्ताईनगर | दि. ३ ऑगस्ट : केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी कथितरीत्या अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्य केले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानालाही धक्का देणारे असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.




यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रक्षाताई खडसे या लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या भावना दुखावल्या असून अशा समाजविघातक प्रवृत्तींवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

भाजपाने भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

या मोर्चात भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, चंद्रकांत भोलाणे, ललिता महाजन, डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, माधुरी सचिन पाटील, साधना ससाणे, नईम बागवान यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.