खवड्या डोंगरावर कुटुंबाचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना वडील दरीत कोसळले, आईनेही गमावला जीव
खवड्या डोंगरावर कुटुंबाचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना वडील दरीत कोसळले, आईनेही गमावला जीव
लेवाजगत न्यूज छत्रपती संभाजीनगर/वाळूज : वडिलांसोबत झालेल्या वादानंतर १९ वर्षीय युवक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. मुलाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती आणि मुलगा दरीत पडल्याचे पाहून आईनेही टोकाचा निर्णय घेतला. अवघ्या काही क्षणांत संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.
मुरलीधर दामोदर चांदगुडे (४८), संगीता चांदगुडे (४२) आणि त्यांचा मुलगा कुणाल (१९) अशी मृतांची नावे आहेत. मूळचे अंबड तालुक्यातील चांदगुडे कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील झाल्टा फाटा परिसरात वास्तव्यास होते.
शुक्रवारी सकाळी कुणालचा वडिलांसोबत वाद झाला. त्यानंतर तो ट्यूशनला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला आणि थेट खवड्या डोंगरावर पोहोचला. तो डोंगराच्या कड्यावर गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच आई-वडील, नातेवाईक तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
आईची अखेरची आर्त हाक
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: बाळा... तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना? हे बघ, मी आता मंगळसूत्र काढून फेकते. तुझ्या वडिलांना सोडून देते आणि तुझ्यासोबत येते; पण मला सोडून जाऊ नकोस रे...एका अभागी आईने काळजाचा तुकडा दरीत कोसळू नये म्हणून गळ्यातले मंगळसूत्र फेकून मारलेली ही आर्त हाक; तर दुसऱ्या बाजूला कुणालने हातातील वस्तू फेकत दिलेला तो एकच नकार— आई, माझं कोणीच ऐकत नाही, माझ्या लाईफचे सोल्यूशनच नाही.
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कुणालला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक मित्रही घटनास्थळी पोहोचला. तब्बल पाऊण तास त्याची मनधरणी सुरू होती. आई-वडील आणि पोलिसांच्या विनवणीनंतर कुणाल काहीसा शांत होत असल्याचे दिसत होते.
मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच व्याकूळ झालेले वडील मुरलीधर यांनी मुलाला पकडण्यासाठी पुढे धाव घेतली. कुणालला पकडण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि दोघेही कड्यावरून खोल दरीत कोसळले. या घटनेने घटनास्थळी उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला.
पती आणि मुलगा दरीत कोसळल्याचे पाहून आई संगीता यांनाही जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांनीही त्याच कड्यावरून खाली उडी घेतली. त्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण चांदगुडे कुटुंबावर काळाने घाला घातला.
मोबाइलच्या हप्त्यावरून वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल नीट-यूजी परीक्षेची तयारी करीत होता. त्याचे वडील मुरलीधर हे ट्रान्स्पोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करीत होते. काही दिवसांपासून मोबाइलच्या थकीत हप्त्यावरून कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद सुरू असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सकाळीही याच कारणावरून वाद झाल्यानंतर कुणाल घराबाहेर पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
खवड्या डोंगरावरील या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका कौटुंबिक वादाचे रूपांतर इतक्या भीषण दुर्घटनेत झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत