धनाजी नाना महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
धनाजी नाना महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
फैजपूर (प्रतिनिधी): तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात तापी परिसर विद्या मंडळाचे सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे तसेच गीतारहस्य या ग्रंथाद्वारे भारतीयांना प्रेरणा देण्याचे त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी विभागाचे सहप्राध्यापक डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. अत्यल्प औपचारिक शिक्षण असूनही आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्याच्या माध्यमातून जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या साहित्याला भारताबरोबरच रशियामध्येही मोठी लोकप्रियता मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या विचारांचा व संस्कारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत