Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात

 

dhanaji-nana-mahavidyalaya-national-librarians-day-book-exhibition

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात

(फैजपूर प्रतिनिधी) — धनाजी नाना महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन व ग्रंथ प्रदर्शन उत्साहात साजरे करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघूळदे यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात ग्रंथालयातील संदर्भग्रंथ, नवीन दाखल झालेली पुस्तके तसेच व्यक्तिमत्त्व विकासावरील साहित्याची शिस्तबद्ध मांडणी करण्यात आली होती.






महाविद्यालयाचे ग्रंथपाल ईरबा गंगाधर गायकवाड यांनी उपस्थितांना डॉ. रंगनाथन यांचा जीवनपरिचय करून देत ग्रंथालयाचे महत्त्व, अद्ययावत माहिती स्रोत, ई-संसाधने आणि डिजिटल सेवांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघूळदे यांनी माहितीच्या युगात गुणवत्तापूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी ग्रंथालय हे विश्वासार्ह केंद्र असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांसोबतच सखोल वाचनाची सवय अंगी बाळगावी. ग्रंथालयातील समृद्ध मुद्रित ग्रंथसंपदा आणि ई-संसाधनांचा अधिकाधिक वापर करून बौद्धिक क्षमतेचा विकास करावा तसेच संशोधन वृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला. यावेळी उपस्थितांकडून प्रदर्शनाबाबत अभिप्रायही नोंदवून घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय कर्मचारी सहर्ष चौधरी, यामिनी पाटील व सुरेखा सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.