ध.ना.महाविद्यालयात बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त अभिवादन
ध.ना.महाविद्यालयात बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त अभिवादन
लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे मराठी विभागाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. स्वाती महाजन यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांमधील साहित्यिक व वाङ्मयीन मूल्यांचा रसाळ आणि प्रभावी शैलीत ऊहापोह केला. बहिणाबाईंच्या कवितांमधून ग्रामीण जीवन, निसर्ग, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध अनुभवांचे समृद्ध दर्शन घडते, असे त्यांनी आपल्या विवेचनातून स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यामागे स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी व शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला देण्यात आले, ही उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास करून त्यातील विविध जीवनानुभव आत्मसात करावेत आणि त्यातून आपले जीवन अधिक समृद्ध करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे, उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना पाटील, मराठी विभागातील प्रा. विजय तायडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत