Contact Banner

कुऱ्हा परिसरात ढगफुटीसदृश पावसाचा कहर; तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्या : आमदार एकनाथराव खडसे

 

cloudburst-like-rains-wreak-havoc-in-kurha-area-eknath-khadse-demands-immediate-survey-and-compensation

कुऱ्हा परिसरात ढगफुटीसदृश पावसाचा कहर; तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्या : आमदार एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात २९ व ३० जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि नदीकाठच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बाधित भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत आणि भरपाई देण्याची मागणी केली आहे.





आमदार खडसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे कुऱ्हा परिसरातील नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये आणि वस्त्यांमध्ये शिरल्याने ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठच्या अनेक शेतजमिनी वाहून गेल्या असून, मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उभी पिके पिवळी पडली असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महसूल, कृषी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शेती, घरे व इतर नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमांनुसार मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खामखेडा पुलाच्या कामातील निष्काळजीपणामुळे नुकसान वाढल्याचा आरोप

आमदार खडसे यांनी खामखेडा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुलाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या पोलभोवतीची माती वेळेवर न हटविल्याने नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला. त्यामुळे नदीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन लगतच्या शेतांमध्ये शिरले आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.

कुऱ्हा परिसरातील तसेच खामखेडा पुलालगतच्या सर्व बाधित क्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना त्वरीत भरपाई द्यावी, तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर आवश्यक कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.