Contact Banner

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदल; वेळीच प्रकार लक्षात आल्याने अनर्थ टळला

 

government-hospital-newborn-baby-swapping-jalgaon-gmc

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदल; वेळीच प्रकार लक्षात आल्याने अनर्थ टळला







जळगाव, दि. ११ (प्रतिनिधी) : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) नवजात बाळांच्या अदलाबदलीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दोन प्रसूत मातांची नावे सारखी असल्याने उपचारासाठी बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेल्या बाळांपैकी एका बाळाची दुसऱ्या महिलेच्या नातेवाईकांकडे सुपूर्दगी झाली. मात्र बाळ आईकडे नेण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

जीएमसीमध्ये एका अल्पवयीन मातेची प्रसूती झाली. तिच्या बाळाचे वजन १ किलो ६०० ग्रॅम होते. त्यानंतर मनीषा लखन भिल यांची प्रसूती झाली असून त्यांच्या बाळाचे वजन ३ किलो ३०० ग्रॅम होते. दोन्ही नवजात बाळांना उपचारासाठी बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

मनीषा भिल यांच्या बाळाची प्रकृती काही तासांनंतर सुधारल्यानंतर स्तनपानासाठी बाळ आईकडे नेण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले. मात्र दोन्ही मातांची नावे सारखी असल्याने दुसऱ्या मातेच्या नातेवाईकांनी चुकून बाळ ताब्यात घेतले. काही वेळाने नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आला.

दरम्यान, प्रसूतीनंतर देण्यात आलेल्या बाळाबाबत काही बाबी संशयास्पद वाटल्याने मनीषा भिल यांनी आपल्या बाळाऐवजी दुसऱ्या महिलेचे बाळ देण्यात आल्याचा आरोप केला.

या प्रकाराची माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता वाबस्कर यांनी बालरोग विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मनीषा भिल यांचे नातेवाईक बाळ घेण्यासाठी आले असता, दोन्ही मातांची नावे एकच असल्यामुळे बाळांची अदलाबदल झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रकार लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अल्पवयीन मातेच्या नातेवाईकांकडून बाळ ताब्यात घेतले. त्यामुळे बाळ चुकीच्या मातेच्या ताब्यात जाण्यापूर्वीच हा गंभीर प्रकार रोखण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.