वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती
वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती
लेवाजगत न्यूज भुसावळ : आयुध निर्माणी वरणगाव कर्मचारी वसाहतीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्वॉर्टर क्रमांक ३, टाईप-२ परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्यावर बिबट्या बसलेला आढळून आला. कर्मचारी प्रवीण चौधरी यांनी या बिबट्याचे छायाचित्र मोबाईल कॅमेऱ्यात टिपले.
प्रवीण चौधरी हे कुटुंबासह श्री सप्तशृंगी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून कारने कर्मचारी वसाहतीकडे परतत असताना पुलाजवळ वाहनाच्या प्रकाशात त्यांना बिबट्या दिसला. काही वेळ बिबट्या पुलाच्या कठड्यावर स्पष्टपणे दिसत असल्याने चौधरी यांनी प्रसंगावधान राखत त्याचे छायाचित्र काढले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः क्वॉर्टर क्रमांक ३, टाईप-२ परिसरात नागरिकांनी तसेच लहान मुलांनी रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
दाट झाडीमुळे बिबट्याला आसरा?
आयुध निर्माणी वरणगावच्या कर्मचारी वसाहतीतील अनेक निवासस्थाने सध्या रिक्त आहेत. कर्मचारी संख्या कमी झाल्याने काही क्वॉर्टर्सचा वापर होत नसून त्यांच्या परिसरात झाडे, झुडपे व काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दाट झाडी आणि निर्मनुष्य परिसरामुळे बिबट्याला येथे आसरा मिळत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचा वावर असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही परिसरात बिबट्याच्या हालचाली जाणवल्याचे तसेच त्याच्या अस्तित्वाच्या काही खुणा आढळल्याचे कर्मचारी सांगतात. आता बिबट्या थेट पुलाच्या कठड्यावर दिसल्याने त्याचा वावर पुन्हा चर्चेत आला असून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत