Contact Banner

दागिने चोरणाऱ्या देराणी-जेठाणीला जेरबंद; १.०५ लाखांचे सोने जप्त

 

jewellery-stealing-sister-in-law-duo-arrested-jalgaon-bus-stand-gold-worth-rs-1-05-lakh-seized

दागिने चोरणाऱ्या देराणी-जेठाणीला जेरबंद; १.०५ लाखांचे सोने जप्त

बसस्थानकातील गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; अमळनेर व जळगावातील गुन्ह्यांचाही उलगडा






प्रतिनिधी | जळगाव

एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत देराणी-जेठाणीला जिल्हापेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. उषा चंदन ससाणे (वय ४८, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५, रा. वाघनगर, जळगाव) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

जळगाव बसस्थानकावर २० जुलै रोजी नवीन चाळीसगाव बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाच्या अंगावरील १० ग्रॅमचे मंगळसूत्र तसेच कानातील टोंगल असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेऊन सापळा रचण्यात आला. त्यानंतर दोन्ही संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान अमळनेर तसेच जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दागिने चोरीच्या गुन्ह्यांचीही माहिती समोर आली. आरोपींकडून ४५ हजार ५० रुपये किमतीची पोत व टोंगल, १५ हजार रुपयांची पोत आणि ४५ हजार रुपयांची पोत असा एकूण १ लाख ५ हजार ५० रुपयांचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले

दरम्यान, जळगाव एसटी बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची प्रवाशांची तक्रार आहे. विशेषतः पाचोरा जाणारी बस ज्या ठिकाणी लागते, त्या परिसरात गर्दीच्या वेळी चोरीच्या घटना घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या असूनही चोरीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दागिने, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी अधिक कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.