फैजपूरात आज मरीमातेच्या बारागाड्या; उत्सवाची तयारी पूर्णत्वास
फैजपूरात आज मरीमातेच्या बारागाड्या; उत्सवाची तयारी पूर्णत्वास
प्रतिनिधी | फैजपूर
फैजपूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या आठवडे बाजार परिसरातील मरीमाता मंदिरात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आज पारंपरिक बारागाड्या उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. उत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यंदा महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते बारागाड्यांची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. पोलिस ठाण्याजवळील विंध्यावासिनी मंदिरापासून भगत संजय कोल्हे, संतोष चौधरी व वासुदेव चौधरी यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात होईल. नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी हे पूजाविधीची माहिती देणार आहेत.
मिरवणूक अंबिका देवी, मोठा मारुती व म्हसोबा मंदिराचे दर्शन घेत वाजत-गाजत मरीमाता मंदिर परिसराकडे मार्गस्थ होईल. या धार्मिक मिरवणुकीत सहकारी भगत भास्कर कपले, सोनू गाजरे, भगवान होले, राजू मेढे, भिका कोळी, यशवंत सराफ, कमलाकर भारंबे, सुभाष वैद्य व मनू तेली यांच्यासह भाविक सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे.
पहिल्या आठवड्यात पूजाअर्चेची परंपरा
श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारागाड्या ओढण्यापूर्वी संजय भगत कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मरीमाता, मोठा मारुती, म्हसोबा आणि अंबिका माता मंदिरात विशेष पूजाअर्चा केली जाते. ही धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून भक्तिभावाने जपली जात आहे.
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फैजपूर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पारंपरिक बारागाड्या उत्सवासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत