Contact Banner

लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

 

leva-bhratrimandal-pimple-saudagar-gunavant-vidyarthi-gungaurav-sohala-2026

लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; तंत्रज्ञानासोबत संस्कार, कौशल्य व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा मान्यवरांचा संदेश

लेवा जगत न्यूज पुणे : लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे यांच्या वतीने दहावी-बारावीमध्ये ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर शिक्षण, ऑलिम्पियाड, क्रीडा, MPSC, UPSC यांसह विविध प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला.

रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता ASM कॉलेज, जुना पुणे-मुंबई रस्ता, पिंपरी, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास सुमारे ८० गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांसह जवळपास २०० लेवा समाजबांधवांची उपस्थिती होती.






कार्यक्रमास भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. APJMJ शेख सलीम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद चौधरी, कोअर टीम सदस्य व गणितज्ञ डॉ. दिलीप देशमुख, कोअर टीम सदस्य व कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ श्री. राहुल शहा, तसेच डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. संदीप पाचपांडे, प्रो. डॉ. दिलीप सरोदे, डॉ. एन. बी. चोपडे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कु. दिया प्रशांत ढाके हिने श्री गणेश वंदना, तर कु. शरयू कुशल चौधरी हिने सरस्वती वंदना सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल, पुणेरी पगडी आणि पर्यावरणपूरक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागरचे अध्यक्ष श्री. विकास वारके यांनी केले. त्यांनी मंडळाच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच लेवा भ्रातृमंडळ आणि कलाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवकाश तंत्रज्ञान व संशोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करार करण्यास दोन्ही संस्थांनी तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमातील नियोजित वेळेमुळे प्रारंभी काही विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कृती करावी : डॉ. शेख सलीम

प्रमुख पाहुणे डॉ. APJMJ शेख सलीम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. अपयशाने खचून न जाता त्यातून शिकावे; आजचे अपयश उद्याच्या उत्तुंग यशाची पायाभरणी करू शकते, असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाला संस्कारांची जोड मिळाल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते. चारित्र्य जपण्यासोबतच समाजासाठी आपण काय देऊ शकतो, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असेही त्यांनी नमूद केले.

पालकांनी मुलांवर अपेक्षा लादू नयेत : राहुल शहा

श्री. राहुल शहा यांनी आजच्या पिढीचे कौतुक करताना पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत, असे आवाहन केले. पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती न होता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आधार देणारी व्यक्ती बनावे, असे त्यांनी सांगितले.

१००० विद्यार्थ्यांद्वारे ३००० रोबोट्स निर्मितीचा उपक्रम

श्री. मिलिंद चौधरी यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यात लवकरच १,००० विद्यार्थ्यांना सहभागी करून तब्बल ३,००० रोबोट्स तयार करण्यासाठी प्रशिक्षण व प्रत्यक्ष कृतीवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. लेवा भ्रातृमंडळ या उपक्रमात सक्रिय सहभागी राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिज्ञासा, शिस्त व नेतृत्वगुण जोपासा

डॉ. दिलीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती, शिस्त, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि नेतृत्वगुण जोपासण्याचे आवाहन केले. उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ. संदीप पाचपांडे यांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळ, समाजकार्य आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. अशा उपक्रमांमधून नेतृत्वगुण विकसित होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो, असे सांगितले. त्यांनी औद्योगिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहितीही दिली.

‘मार्क्स’पेक्षा विद्यार्थ्यांमधील ‘गुण’ महत्त्वाचे

डॉ. अभिजित सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी ‘मार्क्स’ आणि ‘गुण’ यातील फरक समजून घेण्याची गरज व्यक्त केली. मार्क्स म्हणजे केवळ एक संख्या; मात्र गुण म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमता, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक गुण. त्यांचा विकास होणे हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाने निरुपयोगी ठरवलेल्या व्यक्तींमधील गुण विकसित करून त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सामाजिक कार्य आपण करत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनीही आपल्या परीने सामाजिक कार्य करावे, असे आवाहन केले.

विविध क्षेत्रांत करिअरच्या मोठ्या संधी

डॉ. दिलीप सरोदे यांनी आजची पिढी गुणवंत असून परीक्षेतील यशासोबतच गुणवत्तापूर्ण कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सैन्यदल, उद्योग व व्यवसाय, पत्रकारिता व समाजमाध्यमे, व्यवस्थापन व हॉस्पिटॅलिटी, कला आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून समाजातील तरुणांनी या क्षेत्रांकडेही गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. निळकंठ चोपडे यांनी विद्यार्थ्यांनी अपयश पचविण्याची शक्ती निर्माण करावी, असे सांगितले. नवीन शिक्षण धोरणात कौशल्यावर भर देण्यात आला असून कौशल्यामध्ये ज्ञान, वर्तणूक आणि नैतिकता या तिन्हींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी यशस्वी व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सुचवले.

यश हा अंतिम टप्पा नसून पहिली पायरी : डॉ. डी. एन. नारखेडे

प्रा. डॉ. डी. एन. नारखेडे यांनी आजचा सोहळा हा स्वप्नांचा, निर्धाराचा, समर्पणाचा आणि शिस्तीचा उत्सव असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे आजचे यश हे अंतिम ध्येय नसून पुढील वाटचालीची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांनी समस्या सोडविण्याची वृत्ती विकसित करावी, ज्ञान आणि संस्कारांचा मेळ साधावा, इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशीच तुलना करावी, विनम्र राहावे, सातत्याने शिकत राहावे आणि निःस्वार्थपणे समाजसेवा करावी, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य भेट

लेवा भ्रातृमंडळाच्या वतीने प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला समाजातील पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक आणि हाय-मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गंगाधर वारके यांच्या प्रेरणादायी आत्मचरित्राचे पुस्तक, अनब्रेकेबल प्लास्टिक बॉक्स टाइप रायटिंग पॅड, सुंदर पेन आणि प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम चौधरी आणि सौ. दुहिता यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. पूनमताई चौधरी, श्रीमती शोभा नारखेडे, सौ. सीमा तळेले, सौ. शरयू खाचणे, श्रीमती वैशाली चौधरी, कु. पूर्वा वराडे, कु. तेजल नारखेडे, कु. वेदांत चौधरी, कु. वेद खाचणे आणि श्री. आदित्य कोलते यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी ASM कॉलेजचे सभागृह डॉ. संदीप पाचपांडे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले. श्री. रोशन पाटील यांनी ११ हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य केले. शेवटी प्रा. दिलीप चौधरी यांनी आभार मानले. त्यानंतर सौ. विभावरी इंगळे यांच्या स्वादिष्ट स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.