एमआयडीसीतील उद्योजकाची आत्महत्या; मालाचे सात लाख रुपये अडकल्याची सुसाइड नोट
एमआयडीसीतील उद्योजकाची आत्महत्या; मालाचे सात लाख रुपये अडकल्याची सुसाइड नोट
जळगाव : एमआयडीसीतील ठिबक सिंचन साहित्य निर्मिती कंपनीच्या ३५ वर्षीय मालकाने कंपनीच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मालाचे पैसे अडकल्याने आर्थिक अडचणीतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
योगेश सुधाकर नेमाडे (वय ३५, रा. ईश्वर कॉलनी) असे मृत उद्योजकाचे नाव आहे. एमआयडीसीतील सेक्टर एम-९१ येथे त्यांची म्हाळसाई इरिगेशन नावाची कंपनी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे चुलतभाऊ सुनील तुकाराम नेमाडे कंपनीत गेले असता योगेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
सुनील यांनी त्यांना तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.
मालाचे सात लाख रुपये अडकल्याचा उल्लेख
पोलिसांना योगेश नेमाडे यांनी लिहिलेली सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामध्ये राजस्थानमधील धार जिल्ह्यात सुमारे सात लाख रुपयांचा माल पाठवला होता; मात्र संबंधितांकडून वारंवार मागणी करूनही पैसे मिळाले नाहीत, असा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एकदा १५ हजार रुपये आणि दुसऱ्यांदा केवळ ८ हजार रुपये मिळाल्याचेही नोटमध्ये नमूद असल्याची माहिती आहे.
सुसाइड नोटमध्ये पत्नीला मुलीकडे लक्ष देण्याचा आणि तिची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. योगेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत