धनाजी नाना महाविद्यालयात आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात
धनाजी नाना महाविद्यालयात आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात
लेवाजगत न्यूज फैजपूर : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समिती आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर योद्धे व आदिवासी नेते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
आदिवासी दिवसाच्या औचित्याने रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. शेरसिंग पाडवी यांनी आदिवासी दिवसाची स्थापना, उद्देश तसेच विविध उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्देशानुसार आदिवासी सुईणींच्या सन्मानाच्या विषयावर बोलताना, आदिवासी समाजाकडे असलेले पारंपरिक ज्ञान आधुनिकतेशी जोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
इतिहास विभागाचे प्रा. डॉ. मारुती जाधव यांनी ऑगस्ट क्रांती दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला. खानदेशच्या भूमीत कर्मयोगी दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली भूमिका, त्यांची स्वातंत्र्यप्राप्तीची तळमळ तसेच ब्रिटिश सरकारने केलेल्या कारवाईचे पुराव्यानिशी सादरीकरण त्यांनी केले. स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे सदैव स्मरण ठेवून देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागातील प्रा. दीपक पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य तथा समिती चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत