राहुल नार्वेकर यांच्या हस्ते नरिमन पॉइंटवरील ‘ओव्हरशूट–लीनिंग इकोलॉजीज’ सार्वजनिक कलेचे उद्घाटन
राहुल नार्वेकर यांच्या हस्ते नरिमन पॉइंटवरील ‘ओव्हरशूट–लीनिंग इकोलॉजीज’ सार्वजनिक कलेचे उद्घाटन
उरण : सुनील ठाकूर-
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते गुरुवारी नरिमन पॉइंट येथे RPG आर्ट फाउंडेशनच्या नवीन सार्वजनिक कला स्थापनेचे ‘ओव्हरशूट–लीनिंग इकोलॉजीज’ उद्घाटन करण्यात आले. कलाकार अरुणकुमार एच.जी. यांनी साकारलेली ही कलाकृती मुंबईच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील प्रवासाचा वेध घेणारी आहे.
उद्घाटनप्रसंगी राहुल नार्वेकर म्हणाले, “RPG आर्ट फाउंडेशनने साकारलेली ही सार्वजनिक कला स्थापना मुंबईच्या विकासाचे सुंदर प्रतिबिंब आहे. या कलाकृतीतील हत्ती प्राचीन गारापुरी लेण्यांपासून आधुनिक वास्तुकलेपर्यंतच्या प्रवासाची आठवण करून देतो. भूतकाळ आणि भविष्य यांच्यातील संतुलन अधोरेखित करणारी ही कलाकृती मुंबईच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करते. शहराच्या शाश्वत विकासाच्या आदर्शांना जपण्यासाठी RPG समूहाचे हे कार्य कौतुकास्पद आहे.”
कलाकार अरुणकुमार एच.जी. म्हणाले, “मुंबईतील अशा महत्त्वाच्या स्थळासाठी कलाकृती साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी RPG आर्ट फाउंडेशनचा आभारी आहे. ऐतिहासिक एलेफंटा अर्थात गारापुरी लेणी आणि तेथील भव्य शिल्पकलेने मला प्रेरणा दिली. मुंबईच्या आधुनिक उभ्या आकांक्षा आणि तिच्या खोल ऐतिहासिक वारशाचा संगम या कलाकृतीत साधण्याचा प्रयत्न केला आहे.”
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात असलेल्या गारापुरी हत्तीच्या प्रतिमेनेही या कलाकृतीला प्रेरणा दिल्याचे त्यांनी सांगितले. हा हत्ती मुंबईच्या सांस्कृतिक लँडस्केपमध्ये इतिहास, सामर्थ्य आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून महत्त्वपूर्ण आहे. वेगाने बदलणाऱ्या आधुनिक मुंबईचा तिच्या ऐतिहासिक वारशाशी संवाद साधण्याचा प्रयत्न ‘ओव्हरशूट–लीनिंग इकोलॉजीज’ या कलाकृतीतून करण्यात आला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत