धनाजी नाना महाविद्यालयात एड्स स्वसंरक्षण व जनजागृतीची शपथ
धनाजी नाना महाविद्यालयात एड्स स्वसंरक्षण व जनजागृतीची शपथ
फैजपूर प्रतिनिधी : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स स्वसंरक्षण व जनजागृतीसंदर्भात शपथ कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी उपस्थित स्वयंसेवक व कॅडेट्स यांना शपथ दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे होते. यावेळी उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना पाटील, आयसीटीसी सेंटर ग्रामीण रुग्णालय न्हावीचे समुपदेशक मनोज चव्हाण, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. मच्छिंद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सविता कलवले (वाघमारे) तसेच एनसीसी अधिकारी कॅप्टन प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी केले. एड्ससारख्या गंभीर आजारापासून युवकांनी स्वतःचे संरक्षण करणे तसेच समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅप्टन प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी युवकांच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकताना भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जात असल्याचे सांगितले. युवकांच्या प्रचंड ऊर्जेचा व क्षमतांचा सकारात्मक वापर केल्यास देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
समुपदेशक मनोज चव्हाण यांनी एचआयव्ही/एड्सचे स्वरूप, कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक काळजी महत्त्वाची असून, एचआयव्हीग्रस्त व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांच्याबद्दल सहानुभूती व संवेदनशीलता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच एड्स प्रतिबंधक उपाययोजनांचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले.
उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वजबाबदारीची जाणीव करून देत विद्यार्थी जीवनात ज्ञानार्जन करून भविष्यातील अर्थार्जनाचा पाया भक्कम करावा आणि समाजऋणातून उतराई होण्यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कीर्ती महाजन यांनी केले, तर श्वेता भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवक आणि कॅडेट्सनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत