राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संशोधन पद्धतीवर वेबिनार उत्साहात
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संशोधन पद्धतीवर वेबिनार उत्साहात
लेवाजगत न्युज जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संशोधन पद्धतीवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची शास्त्रीय दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन तसेच गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्राचार्या प्रा. कविता देशमुख, डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नयना झोपे आणि वेबिनारचे प्रमुख वक्ते डॉ. ए. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. प्रशांत विजयसिंह पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत पाटील यांनी संशोधनाची संकल्पना, संशोधन समस्या ओळखणे, माहितीचे संकलन, तिचे शास्त्रीय विश्लेषण तसेच निष्कर्ष मांडण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. संशोधन पद्धती म्हणजे संशोधनाची समस्या ओळखण्यापासून माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष मांडण्यापर्यंतची शास्त्रीय प्रक्रिया होय, असे स्पष्ट करत त्यांनी संशोधन करताना वस्तुनिष्ठता, अचूकता आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. ईश्वर राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही महाविद्यालयांतील शिक्षकवृंद डॉ. कीर्ती पाटील, डॉ. नदीम शेख, श्री. प्रदीप महाजन, श्रीमती मीनल राणे आणि प्रा. जयश्री कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ग्रंथालय, वाचन आणि संशोधन यांचा परस्पर संबंध समजून घेण्याची तसेच संशोधनाची शास्त्रीय पद्धत जाणून घेण्याची संधी मिळाली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत