रावेरला प्रथमच भव्य रोजगार मेळावा; ४५ तरुणांची प्राथमिक निवड
भर पावसातही ११५ उमेदवारांची नोंदणी; डॉ. केतकी पाटील फाउंडेशन व कौशल्य विकास केंद्राचा संयुक्त उपक्रम
लेवाजगत न्यूज रावेर : स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. केतकी पाटील फाउंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सरदार जी. जी. हायस्कूलच्या सहकार्याने रावेर येथे प्रथमच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (११ ऑगस्ट) झालेल्या या मेळाव्याला भर पावसातही तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ११५ उमेदवारांनी नोंदणी केली असून, विविध कंपन्यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर ४५ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरच्या नगराध्यक्षा संगीता महाजन होत्या. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ धनके, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, सरदार जी. जी. हायस्कूलचे चेअरमन संतोषशेठ अग्रवाल, विवरेचे माजी सरपंच वासुदेव नरवाडे, जळगाव पूर्वच्या भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डॉ. केतकी पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, भाजप रावेर उत्तर मंडळाध्यक्ष रवींद्र पाटील, रोजगार कौशल्य केंद्राचे दिनेश चौधरी, डॉ. संदीप पाटील, रावेर शिक्षण संस्थेचे देवेंद्र मिसर, उमेश महाजन, नगरसेवक दिलीप पाटील, राजू सुवर्णे, योगिता पाटील, सपना महाजन, अर्चना पाटील, राजेश शिंदे, अमोल पाटील, मनोज श्रावगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव नरवाडे यांनी केले. रोजगार मेळाव्यासाठी जळगाव, चोपडा, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सात नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
रावेर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये असलेल्या एकूण ११५ उमेदवारांनी अधिकृत नोंदणी केली. नोंदणीनंतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कंपनीच्या आवश्यकतेनुसार ४५ उमेदवारांची पहिल्या टप्प्यात प्राथमिक निवड करण्यात आली.
प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याऐवजी स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम रावेरमध्ये प्रथमच राबविण्यात आला. त्यामुळे हा उपक्रम तरुणांसाठी महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत