Contact Banner

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सन्मानार्थ रावेरात भव्य मूक मोर्चा; महिलांच्या सन्मानासाठी नागरिकांची एकजूट

raver-silent-march-in-support-of-union-minister-raksha-khadse-demand-for-action-over-alleged-offensive-remarks


केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सन्मानार्थ रावेरात भव्य मूक मोर्चा; महिलांच्या सन्मानासाठी नागरिकांची एकजूट

रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) रावेर येथे समस्त नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला रावेर तालुक्यासह परिसरातील विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






मूक मोर्चामध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. याशिवाय महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून महिलांच्या सन्मानासाठी आपली एकजूट दर्शविली.

मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी (नंदुरबार) यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याची ठाम भूमिका व्यक्त केली. तसेच रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असून, अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात समाज एकसंघ असल्याचा संदेश या शांततापूर्ण मूक मोर्चातून देण्यात आला.

विशेष बाब म्हणजे, मोर्चा नियोजित वेळेनुसार सुरू झाल्याने अनेक नागरिकांना वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे तहसील कार्यालयात निवेदन सादर झाल्यानंतरही मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे सुरुवातीच्या उपस्थितीपेक्षा नंतर सहभागी झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.