शिरपूरमध्ये सराफ दुकानातून ६ लाखांचे दागिने लंपास तीन बुरखाधारी महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद; शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरपूरमध्ये सराफ दुकानातून ६ लाखांचे दागिने लंपास
तीन बुरखाधारी महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद; शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरपूर : शहरातील महात्मा गांधी मार्केटमधील ‘नंदुरबारकर सराफ’ या सोने-चांदीच्या दुकानातून तीन अज्ञात बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करून तब्बल ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सन्मुखलाल सराफ (रा. सरस्वती कॉलनी, शिरपूर) यांचे महात्मा गांधी मार्केटमध्ये ‘नंदुरबारकर सराफ’ नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले होते. दुपारी सुमारे २ वाजता काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेल्या तीन अज्ञात महिला ग्राहक म्हणून दुकानात आल्या.
महिलांनी कानातील सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. काही वेळ दागिने पाहिल्यानंतर त्यांनी कोणतीही खरेदी न करता दुकानातून काढता पाय घेतला.
दरम्यान, रात्री दुकान बंद करण्यापूर्वी सराफ यांनी दुकानातील स्टॉकची तपासणी केली. त्यावेळी सोन्याच्या कानातील दागिन्यांचा एक बॉक्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दुपारी दुकानात आलेल्या त्याच तीन महिलांनी नजर चुकवून दागिन्यांचा बॉक्स लांबवल्याचे स्पष्ट झाले.
सुरेंद्र सराफ यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात बुरखाधारी महिलांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपी महिलांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत