त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन महिनाभर बंद
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन महिनाभर बंद
त्र्यंबकेश्वर : श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या श्रावण मासाच्या कालावधीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि मंदिर प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ केंद्र व राज्य सरकार अथवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या अधिकृत लेखी पत्रव्यवहारानुसार अती महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त सर्व व्हीआयपी दर्शन सुविधा बंद राहतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनुने (धर्मादाय सह आयुक्त-१, नाशिक) यांनी दिली.
२० व्हीआयपींची मर्यादा
शासकीय विभागांकडून येणाऱ्या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दररोज सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या दोन वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या निर्धारित वेळेतही जास्तीत जास्त २० अती महत्त्वाच्या व्यक्तींनाच दर्शनाची सुविधा देवस्थान ट्रस्टकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत