Contact Banner

श्रावण सोमवारनिमित्त रोषणाईने उजळले दसनूरचे उमेश्वर महादेव मंदिर

 

shravan-somvar-roshanai-dasunur-umeshwar-mahadev-mandir

श्रावण सोमवारनिमित्त रोषणाईने उजळले दसनूरचे उमेश्वर महादेव मंदिर

लेवाजगत न्यूज सिंगनूर, ता. रावेर : दसनूर येथील सुकी नदीच्या काठावर वसलेले सुमारे आठशे वर्षांची परंपरा लाभलेले प्राचीन स्वयंभू उमेश्वर महादेव मंदिर श्रावण सोमवारनिमित्त आकर्षक फुलांची आरास आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. श्रावण महिन्यामुळे मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.






या प्राचीन मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असून भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवासाचीही उभारणी करण्यात आली आहे. मंदिराबाबत अनेक पुरातन आख्यायिका प्रचलित आहेत. दशरथ राजा शृंगधाम यांनी सिंगत येथील श्रृंगऋषींना श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अयोध्येला येऊन पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची विनंती केली होती. त्यावेळी श्रृंगऋषींनी दसनूर येथे मुक्काम करून उमा-महेश्वराची मनोभावे आराधना केल्याची आख्यायिका सांगितली जाते.

मंदिराच्या स्वयंभू पिंडीबाबतही एक श्रद्धास्थानाशी निगडित आख्यायिका आहे. पूर्वी या ठिकाणी उकिरडा होता. एका भक्ताला तेथे साक्षात्कार झाल्यानंतर जागा स्वच्छ करताना जमिनीतून स्वयंभू शिवपिंड आढळून आली. पिंडीला फावडे लागल्यावर पाणी व रक्ताच्या धारा निघाल्याचे सांगितले जाते. ही पिंड गावात स्थापित करण्यासाठी खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र खोदकाम करताना जमिनीखाली पाणी लागले आणि पिंडीचा अंत सापडला नाही. त्यामुळे ती स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

ही शिवपिंड जमिनीत काही अंतरावर अष्टकोनी आकाराची असून त्याच ठिकाणी पुढे मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराची रचनाही अष्टकोनी आकाराची आहे. पूर्वी माती आणि दगडांपासून बांधण्यात आलेल्या या मंदिराला आता नवीन बाह्यरूप देण्यात आले आहे. गेल्या सुमारे २०० वर्षांपासून येथे सकाळ-संध्याकाळ नियमितपणे महादेवाची आरती व पूजापाठ करण्याची परंपरा सुरू आहे.

श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात फराळ व प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवारी भजन, अभंग, गवळणी आणि गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील भजनी मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मुकुटाची मोठी दिंडी गावातून काढली जाते. तसेच कार्तिक महिन्यात पहाटे कार्तिक स्नान, गावातून काकड आरती आणि दिंडी काढण्याची परंपराही आजतागायत सुरू आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश्वर महादेव संस्थानचे सर्व संचालक, सदस्य, भजनी मंडळी आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.