यंदाची वारी ‘परळच्या राजा’च्या दारी; पंढरपूरच्या देखाव्यातून भक्तिमय वातावरण
यंदाची वारी ‘परळच्या राजा’च्या दारी; पंढरपूरच्या देखाव्यातून भक्तिमय वातावरण
८०व्या वर्षानिमित्त ‘परळचा राजा’ मंडळाकडून भव्य पंढरपूर देखावा; २४ फुटी विठ्ठलाची प्रतिकृती ठरणार आकर्षण
उरण :लेवाजगत न्यूज सुनिल ठाकूर-
मुंबईतील नरेपार्क येथील परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात ‘परळचा राजा’ या गणेशोत्सव मंडळाचा यंदा ८०वा वर्धापनदिन साजरा होत असून, यानिमित्ताने मंडळाकडून यंदा पंढरपूरच्या वारीचा देखावा साकारण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात रंगणार आहे.
मंडळाच्या परिसरात पंढरपूर मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार असून, मुख्य महाप्रवेशद्वारावर विठ्ठलाची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या रूपातील २४ फुटी विठ्ठलाचा भव्य अवतार हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दरम्यान, ‘परळच्या राजा’चा शिस्तबद्ध आगमन सोहळा शनिवार, २९ ऑगस्ट रोजी गणसंकुल येथून भारतमाता मार्गे नरेपार्क मैदानापर्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पंढरपूरच्या वारीतील ब्रह्मनाद आणि रिंगणाचा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय उपक्रम, विद्यार्थी गुणगौरव तसेच रुग्णसेवेसाठी के.ई.एम. रुग्णालयाला स्ट्रेचर देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘परळचा राजा’ची मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार श्री. निखिल खातू यांनी साकारली असून, मंडळाचे अध्यक्ष श्री. अभिषेक परब आहेत. मंडळाच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती विश्वस्त श्री. मिलिंद गावडे यांनी दिली.
८०व्या वर्षानिमित्त साकारण्यात येणारा पंढरपूरचा देखावा, भव्य विठ्ठल प्रतिकृती आणि सामाजिक उपक्रमांमुळे यंदाचा ‘परळचा राजा’चा गणेशोत्सव विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत