पूर्व विभागातील वाहतूककोंडीवर शिवसेनेचा दणका; अवजड वाहतुकीला वेळेची मर्यादा
पूर्व विभागातील वाहतूककोंडीवर शिवसेनेचा दणका; अवजड वाहतुकीला वेळेची मर्यादा
सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ट्रेलर-कंटेनर वाहतूक थांबवणार
उरण : सुनील ठाकूर-
उरण पूर्व विभागातील खोपटा–कोप्रोली–चिरनेर मार्गावरील सातत्याने होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत वाहतूक विभागावर दणका दिला. या मार्गावरील वाहतूककोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने यापूर्वीच दिला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवार, १९ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उरण वाहतूक पोलीस विभागात धडक देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी वाहतूक विभागाच्या वतीने संजय पाटील उपस्थित होते.
शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील यांनी यापूर्वी वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन विविध उपाययोजनांची मागणी केली होती. काही दिवस उपाययोजना करण्यात आल्या; मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला.
बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पूर्व विभागातील अवजड ट्रेलर व कंटेनर वाहतूक थांबविण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाहतूककोंडीवर केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता दीर्घकालीन तोडगा काढण्याची गरज असल्याचे संतोष ठाकूर यांनी सांगितले. यासाठी जेएनपीटी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, आरटीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सीएफएस कंटेनर यार्डचे मालक व व्यवस्थापक तसेच पोलीस आणि वाहतूक पोलीस विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.
राजकीय पक्ष म्हणून शिवसेना संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार करणार असून, वाहतूक पोलीस विभागानेही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून संयुक्त बैठकीचे नियोजन करावे, अशी मागणी तालुका संघटक बी. एन. डाकी यांनी केली.
यासंदर्भातील निवेदन पंचायत समिती सदस्या कविता पाटील यांनी बुधवारी वाहतूक विभागाला दिले.
बैठकीस तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, पंचायत समिती सदस्या कविता पाटील, तालुका उपसंघटक रूपेश पाटील, माजी तालुकाप्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, वशेणीच्या सरपंच अनामिका म्हात्रे, उपसरपंच गणेश म्हात्रे, कोप्रोली शाखाप्रमुख रवींद्र म्हात्रे, अशोक पाटील, संतोष पाटील, नंदन म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत