Contact Banner

जि.प.तील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; ९५३ जागांसाठी पवित्र प्रणालीवर प्रक्रिया

 

zp-teacher-recruitment-953-vacancies-pavitra-system-jalgaon

जि.प.तील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; ९५३ जागांसाठी पवित्र प्रणालीवर प्रक्रिया





लेवाजगत न्यूज जळगाव : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पवित्र प्रणालीमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ९५३ शिक्षक पदे भरली जाणार आहेत. टीएआयटी-२०२५मध्ये सहभागी झालेल्या पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात ४५६, तर माध्यमिक विभागात ४९७ पदे रिक्त आहेत. प्राथमिक विभागातील पदांमध्ये मराठी माध्यमाची २५१ आणि उर्दू माध्यमाची २०५ पदे आहेत.

मराठी माध्यमातील पदांमध्ये गणित-विज्ञान विषयासाठी १२६, भाषा विषयासाठी ८३, इंग्रजीसाठी २०, मराठीसाठी ११ आणि हिंदीसाठी ११ पदांचा समावेश आहे. उर्दू माध्यमात प्राथमिक स्तरासाठी १५०, तर सहावी ते आठवीसाठी गणित-विज्ञानाची ३७ आणि उर्दू भाषेची १८ पदे उपलब्ध आहेत.

माध्यमिक विभागातील रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील १३८ माध्यमिक शाळांनी पवित्र प्रणालीवर नोंदणी केली आहे. त्यानुसार एकूण ४९७ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवाराने टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे तसेच टीएआयटी-२०२५मध्ये सहभाग घेतलेला असणे बंधनकारक आहे.

पवित्र प्रणालीवर अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, आरक्षणाचा प्रवर्ग, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूकपणे भरावी, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिक्त पदांचा आरक्षणनिहाय व समांतर आरक्षणाचा सविस्तर तपशील जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या भरतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होऊन विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.