Contact Banner

बोदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा रक्षा खडसे यांनी घेतला आढावा


 बोदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा रक्षा खडसे यांनी घेतला आढावा


 पावसाअभावी पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आश्वासन


kingaon-char-dham-yatra-dagadu-patil-yamunotri-heart-attack-death-haridwar-funeral



लेवाजगत न्यूज बोदवड :रावेर लोकसभा मतदारसंघातील बोदवड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन आढावा घेतला. त्यांनी हिंगणा, आमदगाव, नाडगाव, जलचक्र, वराड, साळशिंगी, मुक्तळ, शेलवड, रेवती आदी गावांना भेट देत पावसाची स्थिती आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.


पावसाअभावी शेतीवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी यावेळी जाणून घेण्यात आल्या. भाजपा पदाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांसह शेतशिवारात भेट देऊन श्रीमती रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाची तूट, पिकांचे नुकसान आणि शेतीसमोरील विविध अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.


खरीप २०२६ हंगामातील पावसाची तूट तसेच अन्य घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ अर्थात ‘पहिली कळ’ लागू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.


या पार्श्वभूमीवर शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक तसेच पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहितीही देण्यात आली.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक मदत आणि दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल, असे रक्षा खडसे यांनी सांगितले. दुष्काळसदृश परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


“शेतकऱ्यांच्या कष्टावर आपल्या अन्नव्यवस्थेचा आधार आहे. संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महसूल अधिकारी तसेच विविध गावांतील शेतकरी बांधव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.