Contact Banner

चिनावल येथे श्रींचे विधिवत पूजन, आरती करून विसर्जन

 

chinawal-ganesh-visarjan-procession-grand-celebration

चिनावल येथे श्रींचे विधिवत पूजन, आरती करून विसर्जन

लेवाजगत न्यूज चिनावल : चिनावल येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी प्रचंड जल्लोष पाहावयास मिळाला. गावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या चिनावलच्या विसर्जन मिरवणुकीचे यंदाही विशेष आकर्षण ठरले.

गावातील १७ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली होती. सातव्या दिवशी रविवारी श्रींचे विधिवत पूजन व आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पोलिस प्रशासनाने दिलेल्या क्रमाप्रमाणे सर्व मंडळांच्या मिरवणुका नियोजित मार्गावरून मार्गस्थ झाल्या.

संपूर्ण राज्यभरातून आलेल्या विविध बँड व बॅन्जो पार्ट्यांनी सादर केलेल्या आकर्षक वादनामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशांचा गजर, बँडच्या तालावर थिरकणारे गणेशभक्त आणि विविध देखावे यामुळे मिरवणुकीत मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी नंदराज पाटील, सावदा पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश फड, फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, रावेरचे तहसीलदार तसेच नायब तहसीलदार संजय तायडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

पोलिस प्रशासनाच्या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मिरवणुकीत गणेशभक्तांचा उत्साह आणि जल्लोष कायम होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.