वनोली, बामणोद व फैजपूर येथील गणेश मंडळांना धनंजय चौधरी यांची भेट श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आरतीचा घेतला लाभ; भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
वनोली, बामणोद व फैजपूर येथील गणेश मंडळांना धनंजय चौधरी यांची भेट
श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आरतीचा घेतला लाभ; भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
लेवाजगत न्यूज फैजपूर : गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव पूर्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ शिरीष दादा चौधरी यांनी वनोली, बामणोद तसेच फैजपूर येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
सर्वप्रथम वनोली येथील एकता गणेश मित्र मंडळास धनंजय चौधरी यांनी भेट दिली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच आरतीमध्ये सहभागी होऊन भक्तिभावाने आरती केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यानंतर त्यांनी बामणोद येथील हनुमान चौक मित्र गणेश मंडळास भेट दिली. मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेत त्यांनी आरतीचा पवित्र लाभ घेतला. उपस्थित गणेशभक्तांशी संवाद साधत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर फैजपूर शहरातील लक्कड पेठ तसेच किरंगेवाडा येथील गणेश मंडळांना धनंजय चौधरी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक यांच्याशी त्यांनी संवाद साधला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक सलोखा दृढ करणारा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून युवकांमध्ये संघटनात्मक भावना निर्माण होण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण होते. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या भेटीदरम्यान श्री गणरायाचे आशीर्वाद घेत धनंजय चौधरी यांनी सर्व गणेशभक्त, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. परिसरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदावा, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी संबंधित गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत