धनाजी नाना महाविद्यालयात युवती सभेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
धनाजी नाना महाविद्यालयात युवती सभेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
फैजपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील विद्यार्थी विकास विभाग आणि युवती सभा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘युवतींचे आरोग्य’ या विषयावर एकदिवसीय व्याख्यान घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघूळदे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या तथा हिंदी विभागप्रमुख डॉ. कल्पना एल. पाटील होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग व युवती सभा प्रमुख डॉ. सीमा बारी यांनी केले. युवतींचे आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नसून शरीर आणि मन यांच्यातील संतुलन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. युवावस्था हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांचा महत्त्वाचा टप्पा असून या काळात भावनांचे व्यवस्थापन आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सिंधू एम. भंगाळे होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन केले. पोषक आहार, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि जंक फूडऐवजी घरगुती पौष्टिक आहाराला प्राधान्य देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मोबाईलवर तासन्तास रील पाहणे किंवा सामाजिक माध्यमांचा अतिवापर करण्यापेक्षा कुटुंबीयांशी संवाद साधावा. विशेषतः आईला मैत्रीण मानून मनातील गोष्टी तिच्याशी मोकळेपणाने शेअर कराव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच आपल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मच्छिंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. कल्पना एल. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. “आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत,” असे सांगत स्वतःमधील गुण-दोष ओळखून ध्येयाकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. शारीरिक अडचणींवर मात करून उंच शिखर गाठणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांचे उदाहरण देत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले.
युवावस्था ही वसंत ऋतूप्रमाणे असून या काळात शारीरिक व मानसिक क्षमता विकसित होत असतात. या क्षमतांचा योग्य उपयोग करून विद्यार्थिनींनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असेही त्यांनी नमूद केले. बाह्यरूप किंवा रंगापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला डॉ. जयश्री पाटील, डॉ. सरला तडवी, डॉ. पल्लवी भंगाळे, डॉ. उन्नती चौधरी, डॉ. शशिकला मगरे, डॉ. स्वप्निल शहा, डॉ. आरती भिडे, प्रा. तिलोत्तमा चौधरी, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा. वैशाली कोष्टी, प्रा. सुवर्णा मुकुंदा चौधरी, प्रा. चैताली पाटील, प्रा. नयना पाटील आणि प्रा. तृप्ती रायकर यांच्यासह प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. छाया किशोर शिरसाळे हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. चेतना नितीन पाटील हिने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत