Contact Banner

नूतन आयटीआय चिनावल येथे सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्युत सुरक्षेचे धडे

 

nutan-iti-chinawal-electricity-safety-week-mahavitaran-students-guidance

नूतन आयटीआय चिनावल येथे सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्युत सुरक्षेचे धडे

लेवाजगत चिनावल : नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चिनावल येथे महावितरण कंपनीतर्फे सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील, उपकार्यकारी अभियंता योगेश पाटील तसेच सहाय्यक अभियंते दीपक पाटील, हितेंद्र पाटील व आकाश नेहेते यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर, वीजप्रवाहाशी संबंधित संभाव्य धोके, अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करताना पाळावयाच्या विविध सुरक्षा उपायांची माहिती देण्यात आली.

‘सुरक्षितता हीच प्राथमिकता’ या दृष्टीने विद्युत कामकाज करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली.

संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणासोबतच कार्यक्षेत्रातील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. चेअरमन खेमचंद्र पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती.

कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य संदीप चौधरी तसेच निदेशक राहुल महाजन, राजेश इंगळे, सरजू होले, विनोद पाटील व वैभव महाजन उपस्थित होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.