Contact Banner

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात फिटनेस कॅम्प, क्विझ, 3D मॉडेल मेकिंग, ‘फिजिओ शार्क टँक’सह रक्तदान शिबिराचे आयोजन


dr-ulhas-patil-college-of-physiotherapy-physiotherapy-week-2026-jalgaon


डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात


फिटनेस कॅम्प, क्विझ, 3D मॉडेल मेकिंग, ‘फिजिओ शार्क टँक’सह रक्तदान शिबिराचे आयोजन


जळगाव, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त विविध शैक्षणिक, क्रीडा, सर्जनशील व सामाजिक उपक्रमांनी फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.


सप्ताहाचे उद्घाटन ३ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यानिमित्त भुसावळ आरटीओ येथे फिटनेस कॅम्प व फिटनेस असेसमेंट आयोजित करून पोलिस कर्मचाऱ्यांच्या विविध फिटनेस चाचण्या घेण्यात आल्या तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयन डॉ. अमित जायस्वाल, डॉ. प्रियांका गुमनानी व डॉ. सचिन यांनी केले.


४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘अ‍ॅनाटॉमी अटॅक’, ‘बायोमेकॅनिक्स बॅटल’, ‘म्नेमोनिक मास्टर्स’, ‘लॉजिक लीग’ आणि ‘एंटरटेनमेंट एक्सप्रेस’ अशा विविध रंजक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला व कल्पकतेला चालना देण्यात आली. या स्पर्धेचे समन्वयन डॉ. चित्रा, डॉ. दीक्षिता, डॉ. अनुराग, डॉ. वैष्णवी, डॉ. ऋतुजा व डॉ. सचिन यांनी केले.


५ सप्टेंबर रोजी 3D मॉडेल मेकिंग स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले. फिजिओथेरपी व आरोग्यविषयक विविध संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक त्रिमितीय मॉडेल सादर केले. या उपक्रमासाठी डॉ. अश्विनी, डॉ. रिया, डॉ. आशिष, डॉ. तेजल, डॉ. धृवी व डॉ. मनोज यांनी समन्वयक म्हणून कार्य केले.


७ सप्टेंबर रोजी ‘फिजिओ शार्क टँक २०२६’ या जाहिरात निर्मिती व नाविन्यपूर्ण सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपीशी संबंधित विविध संकल्पना प्रभावी जाहिरातींच्या माध्यमातून सादर करून आपल्या सर्जनशील विचारांची छाप पाडली. या स्पर्धेचे समन्वयन डॉ. पायल, डॉ. नेहा, डॉ. सेजल व डॉ. सोनिया यांनी केले.


सप्ताहाची सांगता वेबिनार व रक्तदान शिबिराने करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचे समन्वयन डॉ. पवन, डॉ. वैष्णवी तसेच विद्यार्थी परिषद सदस्यांनी केले.


यावेळी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुष्पगुच्छ व कौतुकपत्र देऊन गौरव करण्यात आला. फिजिओथेरपी सप्ताहातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, सर्जनशीलता व सामाजिक जाणीवेचा सर्वांगीण विकास साधल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.