गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, तंत्रज्ञान व कॉर्पोरेट प्रणालीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, तंत्रज्ञान व कॉर्पोरेट प्रणालीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
जळगाव, प्रतिनिधी : पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाचा अनुभव मिळावा आणि उद्योगक्षेत्रातील कार्यप्रणालीची माहिती व्हावी, या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी गाडेगाव येथील ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उद्योगातील विविध विभागांचे कामकाज, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान तसेच व्यवस्थापन प्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.
कंपनीतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध विभागांची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. गुणवत्ता हमी विभागाचे जयदीप सिंग यांनी गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनांची गुणवत्ता तपासणी आणि त्यासंबंधीच्या विविध मानकांची माहिती दिली. पीव्हीसी विभागाचे प्रभारी गोपाल पांडे यांनी पीव्हीसी उत्पादन प्रक्रिया तसेच उत्पादनातील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. इंजिनिअरिंग लाईनचे सुमित नारखेड यांनी प्रॉडक्शन लाईन्सची रचना, यंत्रसामग्रीचे कार्य आणि विविध इंजिनिअरिंग प्रक्रियांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.
मानव संसाधन विभागाचे धनंजय जोहुरकर यांनी मानवी संसाधन व्यवस्थापन, कॉर्पोरेट संस्कृती, सुरक्षा नियम तसेच उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे वर्क्स डायरेक्टर गिरीराज सक्सेना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कॉर्पोरेट जगतातील अपेक्षा, व्यावसायिक कौशल्ये, शिस्त, कार्यक्षमता आणि करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरण, उत्पादनाचे विविध टप्पे, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे धडे अनुभवातून शिकता आले. अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष उद्योगविश्वाशी जोडण्याच्या दृष्टीने ही भेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. औद्योगिक भेटीचे आयोजन प्रो. रेणुका पोळ यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत