Contact Banner

औद्योगिक भेटीत विद्यार्थिनींनी जाणून घेतली उत्पादन प्रक्रिया अन् कॉर्पोरेट कार्यपद्धती

 

dr-varsha-patil-womens-college-students-industrial-visit-supreme-industries-jalgaon

औद्योगिक भेटीत विद्यार्थिनींनी जाणून घेतली उत्पादन प्रक्रिया अन् कॉर्पोरेट कार्यपद्धती

जळगाव, प्रतिनिधी : पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थिनींना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरण, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, जळगाव येथील विद्यार्थिनींसाठी गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.

या भेटीदरम्यान विद्यार्थिनींना उद्योगातील विविध विभागांचे कामकाज जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. कंपनीतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

जयदीप सिंग (गुणवत्ता हमी विभाग) यांनी उत्पादनांची गुणवत्ता तपासणी, क्वालिटी कंट्रोल तसेच आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांविषयी माहिती दिली. गोपाल पांडे (पीव्हीसी प्रभारी) यांनी पीव्हीसी उत्पादन प्रक्रिया आणि त्यातील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. सुमित नारखेडे (इंजिनिअरिंग लाईन) यांनी उत्पादन लाईनची रचना, यंत्रसामग्रीचे कार्य आणि विविध इंजिनिअरिंग प्रक्रियांविषयी माहिती दिली. तर धनंजय जोहुरकर (मानव संसाधन) यांनी मानव संसाधन व्यवस्थापन, कॉर्पोरेट संस्कृती, उद्योगक्षेत्रातील कार्यपद्धती तसेच रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे वर्क्स डायरेक्टर गिरीराज सक्सेना यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधला. कॉर्पोरेट जगतातील अपेक्षा, व्यावसायिक कौशल्ये, शिस्त, कार्यक्षमता आणि भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव घेताना उत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, व्यवस्थापन प्रणाली आणि कॉर्पोरेट कार्यसंस्कृती समजून घेता आली. अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष कामकाजाशी जोडण्याच्या दृष्टीने ही भेट विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. औद्योगिक भेटीचे आयोजन प्रो. मानसी अहिरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.