Contact Banner

दूध उत्पादक सक्षम झाला तरच सहकारी दूध संघ मजबूत होईल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

dudh-utpadak-majboot-zala-tarach-sahakari-dudh-sangh-majboot-palakamntri-gulabrao-patil

दूध उत्पादक सक्षम झाला तरच सहकारी दूध संघ मजबूत होईल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

दूध उत्पादकांच्या प्रश्नांसाठी दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळा घेण्याच्या सूचना

दूध उत्पादक सक्षम झाला तरच सहकारी दूध संघ मजबूत होईल : पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : दूध उत्पादक हा सहकारी दूध संघाचा केंद्रबिंदू असून, दूध उत्पादक सक्षम झाला तरच सहकारी दूध संघ खऱ्या अर्थाने सक्षम होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित चेअरमन कार्यशाळेत ते बोलत होते.

दूध उत्पादकांनी खासगी विक्री कमी करून अधिकाधिक दूध सहकारी दूध संघाला द्यावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. दूध संकलनाबरोबरच दुधाची गुणवत्ता वाढविणे, उत्पादकांना योग्य दर मिळवून देणे आणि संघाच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी सहकारी व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दूध उत्पादकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळा आयोजित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पशुपालकांना शासन तसेच एनडीडीबीच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघाने प्रयत्न करावेत. दुग्ध व्यवसायासाठी कर्ज उपलब्धतेबाबत बँक अधिकारी आणि दूध उत्पादकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दूध तपासणीसाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न करावा, तसेच पशुधनाच्या आरोग्यासाठी दर्जेदार पशुखाद्याचा वापर वाढवावा, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी दिले.

३२८ दूध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी

या कार्यशाळेला जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि जामनेर या सात तालुक्यांतील ३२८ दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन, सचिव व प्रतिनिधी सहभागी झाले होते. उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या २२ दूध उत्पादक संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यशाळेस संचालक मधुकर राणे, अरविंद देशमुख, श्यामल झांबरे, छाया देवकर, दगडू चौधरी, रमेश पाटील, नितीन चौधरी यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दूध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.