अमरावती, पुणे, मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या स्टेशनवर ३ तासांपर्यंत थांबणार जळगाव-म्हसावददरम्यान मंगळवारी १२ तासांचा मेगाब्लॉक; ६ मेमू रद्द, १९ गाड्यांना बसेल फटका
अमरावती, पुणे, मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या स्टेशनवर ३ तासांपर्यंत थांबणार
जळगाव-म्हसावददरम्यान मंगळवारी १२ तासांचा मेगाब्लॉक; ६ मेमू रद्द, १९ गाड्यांना बसेल फटका
प्रतिनिधी | जळगाव
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-म्हसावददरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्यासाठी मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सहा मेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, १९ एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर तीन तासांपर्यंत थांबविण्यात येणार आहेत. तत्पूर्वी ७ सप्टेंबर रोजी पूर्व-काम (प्री-नॉन-इंटरलॉकिंग) करण्यात येणार असून, त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे.
८ सप्टेंबर रोजी इगतपुरी-भुसावळ मेमू (गाडी क्र. ११११९), भुसावळ-इगतपुरी मेमू (गाडी क्र. १११२०), भुसावळ-देवळाली मेमू (गाडी क्र. ११११३), देवळाली-भुसावळ मेमू (गाडी क्र. ११११४), नाशिक रोड-बडनेरा मेमू (गाडी क्र. ६११२९) आणि बडनेरा-नाशिक रोड मेमू (गाडी क्र. ६११३०) या सहा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉकमुळे वंदे भारत आणि दादर एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (२६१०२) ही गाडी ८ सप्टेंबर रोजी अजनी येथून सकाळी ९.५० वाजता सुटण्याऐवजी तीन तास उशिराने दुपारी १२.५० वाजता सुटणार आहे. तसेच भुसावळ-दादर एक्स्प्रेस (१९००४) ही गाडी भुसावळ येथून सायंकाळी ५.४० वाजता सुटण्याऐवजी एक तास उशिराने सायंकाळी ६.४० वाजता रवाना होणार आहे. यामुळे अमरावती, पुणे, मुंबई, दिल्लीसह विविध मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत रेल्वेने प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे. घराबाहेर पडण्यापूर्वी संबंधित गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासूनच प्रवासाला सुरुवात करावी. गरज नसल्यास प्रवास दुसऱ्या दिवशी करावा किंवा पर्यायी वाहतुकीचा वापर करावा. प्रवासाच्या दिवशी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर गाडीचे लोकेशन व सुधारित वेळ तपासून वेळेची खात्री करावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत