Contact Banner

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कमाफी; अभाविपच्या मागणीला यश

 

dushkalgrast-vidyarthyanna-sampurna-pariksha-shulkmafi-abhavipchya-maganila-yash

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कमाफी; अभाविपच्या मागणीला यश


dushkalgrast-vidyarthyanna-sampurna-pariksha-shulkmafi-abhavipchya-maganila-yash
 येथे जाहिरात प्रसिद्ध करायची आहे संपर्क साधा- लेवा जागत न्यूज 8983689844


लेवाजगत न्यूज जळगाव : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा तसेच प्रभावित भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती.

अभाविपच्या मागणीची दखल घेत राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला टप्पा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक संकटाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, ५ ऑक्टोबरपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा अभाविपने व्यक्त केली आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सर्व सवलतींची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही अभाविपने म्हटले आहे.

अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आधी शुल्क भरायचे आणि तीन-चार महिन्यांनी शासनाकडून परतावा मिळवायचा, ही प्रक्रिया टाळली पाहिजे. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता ते स्वनिधीतून भरावे आणि नंतर शासनाकडून त्याची प्रतिपूर्ती करून घ्यावी. संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देणे हीच या शुल्कमाफीची खरी अंमलबजावणी ठरेल.”

अभाविपने शासनाच्या निर्णयाचे स्वागत करताना दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा प्रत्यक्ष आणि तातडीने लाभ मिळण्यासाठी विद्यापीठांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.