एकदंत गणेश मंडळाचा रोझोद्यात स्तुत्य उपक्रम श्रीराम व कामसिद्ध मंदिराला ५५ हजार ५५५ रुपयांची देणगी
एकदंत गणेश मंडळाचा रोझोद्यात स्तुत्य उपक्रम
श्रीराम व कामसिद्ध मंदिराला ५५ हजार ५५५ रुपयांची देणगी
लेवाजगत न्युज रोझोदा, ता. रावेर (प्रतिनिधी): सामाजिक, धार्मिक आणि विधायक कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या रोझोदा येथील एकदंत गणेश मंडळाने गावातील जागृत तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाला ५५ हजार ५५५ रुपयांची देणगी देत समाजोपयोगी कार्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला. कामसिद्ध मंदिर परिसरात नुकताच हा देणगी प्रदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
रावेर तालुक्यातील एकदंत गणेश मंडळ, बजरंग ग्रुप आणि जय माता दी दुर्गोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. धार्मिक उत्सव केवळ आनंदाने साजरे करण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यातून शिल्लक राहिलेल्या निधीचा उपयोग गावातील धार्मिक व सामाजिक विकासासाठी व्हावा, या विधायक भावनेतून मंडळांनी हा निर्णय घेतला.
कार्यक्रमात एकदंत गणेश मंडळाचे खजिनदार पुष्पक नेमाडे यांच्या हस्ते देणगीचा धनादेश श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय राघव महाजन, उपाध्यक्ष टेनूदास यादव फेगडे आणि सचिव वसंत भगवान बोंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी गावातील तरुणांनी एकत्र येऊन धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे रोझोदा, खिरोदा, सावखेडा, कोचूर तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
कार्यक्रमाला रविंद्र धांडे, सुनील राणे, भास्कर भंगाळे, राजेंद्र चौधरी, हर्षल चौधरी, अक्षय चौधरी, सुचेतन फेगडे, संजय चौधरी, सागर चौधरी, उदय चौधरी, केतन लिधूरे, राहुल लिधूरे, अमोल चौधरी, अक्षय सोनवणे, तुषार बावस्कर, प्रेम बावस्कर, दर्शन टोंगळे, उत्कर्ष चौधरी, आदित्य टोंगळे, स्वप्निल धांडे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक उत्सवांना विधायक आणि समाजोपयोगी कार्याची जोड देणारा हा उपक्रम गावासाठी अनुकरणीय ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत