गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक, करिअर व नवोपक्रमाच्या संधींची माहिती
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इंडक्शन (प्रवर्तन) कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, विविध सुविधा, संधी आणि वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती करून देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. द्वितीय वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स शाखेचे विद्यार्थी चेतन चौधरी आणि ऋषिकेश पाटील यांनी ‘बलसागर भारत होवो’ हे देशभक्तीपर गीत सुरेल आवाजात सादर केले.
यानंतर विद्यार्थ्यांना गोदावरी फाउंडेशन तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, विविध शैक्षणिक संधी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संशोधन व नवोपक्रमाच्या संधी, क्रीडा सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांनी अभियांत्रिकी शिक्षणातील चार वर्षांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, विद्यार्थ्यांनी या कालावधीचा योग्य व नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या अभियांत्रिकी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अभ्यासक्रमासोबतच अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रमांमध्ये सहभाग घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्लेसमेंटची तयारी, आवश्यक कौशल्ये आणि करिअर विकासाबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात अधिष्ठाता—संशोधन व नवोपक्रम तथा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांनी ‘स्वयम-एनपीटीईएल’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
इंडक्शन (प्रवर्तन) कार्यक्रमाचे आयोजन बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागाच्या वतीने करण्यात आले. समन्वयक प्रा. प्रविण सोनवणे व प्रा. पूनम वाणी यांनी विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार यांनी केले. चेतन चौधरी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत