Contact Banner

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची स्थापना

 

godavari-foundation-djemukt-ganeshotsav-health-institutions-jalgaon

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची स्थापना

जळगाव : ध्वनीप्रदूषणाला आळा घालत पर्यावरणपूरक आणि संस्कारक्षम गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांनी यंदा ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला कृतीची जोड देत गोदावरी हेल्थ सिटीसह विविध महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये विधिवत स्थापना

गोदावरी हेल्थ सिटीअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. युवराज व डॉ. पल्लवी बढे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. माया आर्विकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी गणरायाच्या आगमनाचा जल्लोष केला. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये उत्साह

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे गणपती बाप्पांचे आगमन अत्यंत उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणात झाले. श्री. व सौ. मिलिंद तायडे यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करण्यात आली. पुरोहित शैलेश नाईक यांच्या विधिवत पूजाविधीनंतर स्थापना सोहळा पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम आणि आकर्षक स्वागत नृत्याने कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल जांभुळकर, मंजिरी मडावी, प्राजक्ता सावकार, सूरज खवाटे, सुमित भारंबे व प्रेशित गायकवाड यांनी सातव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने परिश्रम घेतले. प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश आगमन व स्थापना सोहळा उत्साहात पार पडला.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात गणरायाची स्थापना

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषाने महाविद्यालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये पारंपरिक वाद्यांचा निनाद

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची विधिवत पूजा व स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फिजिओथेरपी महाविद्यालयात भक्तिभावाने स्थापना

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गणपती स्थापना सोहळा भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासन अधिकारी राहुल गिरी यांच्यासह फिजिओथेरपी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून एकता, संस्कृती, संस्कार आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा उत्सव आहे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

गोदावरी फाउंडेशनच्या विविध आरोग्य व शैक्षणिक संस्थांमध्ये डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्ये, भक्तिगीते आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांना सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.