पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी! चार प्रयत्नांनंतर यश; ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींचा जल्लोष
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
चार प्रयत्नांनंतर यश; ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींचा जल्लोष
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ४ सप्टेंबर : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल पाच थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. हंडी फोडण्यासाठी चार वेळा प्रयत्न करण्यात आले. अखेर पाचव्या थरावर यशस्वी चढाई करत विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडताच परिसरात जल्लोष झाला.
कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी.एम. कार्डिओलॉजिस्ट तथा गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. वैभव पाटील, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, उपप्राचार्य जेसिंथ ढाया, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बाविस्कर, परिचारिका अधीक्षक संकेत पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा वाघ यांनी केले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, भगवान गोपाळ कृष्णाचे पूजन व झुला पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला.
‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींच्या पथकांनी मानवी मनोरा रचण्यास सुरुवात केली. पहिल्या काही प्रयत्नांत दहीहंडी फोडण्यात यश आले नाही. मात्र, विद्यार्थिनींनी हार न मानता पुन्हा जोमाने प्रयत्न केले. चार प्रयत्नांनंतर पाच थरांचा मजबूत मानवी मनोरा उभारण्यात आला आणि अखेर विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. हंडी फुटताच विद्यार्थिनींनी जल्लोष करत आनंद साजरा केला.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या ‘अधिरम’ बॅचच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दहीहंडीच्या या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये एकजूट, संघभावना, आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ झाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या उत्साहाचे कौतुक केले. पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासोबतच संघभावना व नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे यावेळी नमूद करण्यात आले.
उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या या दहीहंडी सोहळ्यामुळे गोदावरी व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा परिसर कृष्णमय झाला होता. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत