जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जनजागृती
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जनजागृती
लेवाजगत न्यूज जळगाव : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य परिचर्या विभागातर्फे डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, जळगाव यांच्या सहकार्याने डॉ. अक्षता पाटील कॉन्फरन्स हॉल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रमुख वक्ते व वरिष्ठ निवासी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष यावले, निवासी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडीक, कनिष्ठ निवासी मानसोपचार तज्ज्ञांची टीम, प्राचार्य विशाखा गणवीर तसेच मानसिक आरोग्य परिचर्या विभागप्रमुख प्रा. अश्विनी वैद्य उपस्थित होते.
यावर्षीच्या ‘आत्महत्येबद्दलची प्रचलित धारणा बदलणे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचा उद्देश आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांभोवती असलेला सामाजिक कलंक दूर करणे, तसेच मानसिक अडचणींच्या काळात वेळेवर मदत घेण्याचे महत्त्व पटवून देणे हा होता.
डॉ. आशिष यावले यांनी मानसिक आरोग्यविषयक जनजागृती, आत्महत्या प्रतिबंध, भावनिक तणावाची लक्षणे ओळखणे तसेच मानसिक अडचणींचा सामना करणाऱ्या व्यक्तींशी संवेदनशील व आधार देणारा संवाद कसा साधावा, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध विषयांवर संवादात्मक चर्चा करत विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. मानसिक आरोग्याच्या समस्या लवकर ओळखणे, योग्य वेळी व्यावसायिक मदत घेणे आणि गरजू व्यक्तीला भावनिक आधार देणे यामध्ये परिचारिकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्राचार्य विशाखा गणवीर यांनी सांगितले.
कार्यक्रम मानसिक आरोग्य परिचर्या विभागप्रमुख प्रा. अश्विनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक व शिक्षकवर्गाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने संवाद साधणे, गरजू व्यक्तीचे म्हणणे समजून घेणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे हे आत्महत्या प्रतिबंधाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग व डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज यांच्या वतीने मानसिक आरोग्य संवर्धन आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी जनजागृती करण्याच्या बांधिलकीचे दर्शन या उपक्रमातून घडले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत