Contact Banner

जामनेर शहरातील उघडे नाले ठरताहेत जीवघेणे!

 


जामनेर शहरातील उघडे नाले ठरताहेत जीवघेणे!

दोन दिवसांत नाल्यात दुसरी कार कोसळली; प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


लेवाजगत न्यूज जामनेर : शहरातील खोल आणि उघड्या नाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील एका खोल नाल्यात कार कोसळल्याची घटना घडली असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत नाल्यात कार कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने शहरातील उघड्या नाल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाल्यांच्या कडेला सुरक्षा कठडे, संरक्षक भिंत, बॅरिकेडिंग किंवा इतर आवश्यक सुरक्षाव्यवस्था का करण्यात आलेली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जबाबदारी नेमकी कुणाची?

या उघड्या नाल्यांची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची, यावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. माहितीनुसार, हे नाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत बांधण्यात आले असून, त्यांच्या देखभालीची जबाबदारी नगरपालिकेकडे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत असल्याची माहिती आहे.

तर दुसरीकडे, नाल्यांचे बांधकाम आणि देखभाल ही सार्वजनिक बांधकाम विभागाचीच जबाबदारी असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात असल्याची माहिती आहे.

विभागांमध्ये जबाबदारीवरून संभ्रम असला, तरी धोका मात्र थेट नागरिकांच्या जीवितास आहे.

अपघातांची मालिका थांबणार कधी?

शहरातील या खोल व उघड्या नाल्यांवर तातडीने सुरक्षा कठडे, संरक्षक भिंती किंवा योग्य बॅरिकेडिंग करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार दुर्घटना घडत असताना प्रशासन आणखी किती घटनांची वाट पाहणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी नेमका कोण पुढाकार घेणार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कधी करणार, याकडे आता जामनेरकरांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.