सरत्या श्रावणाला निरोप देण्यासाठी आवरे येथे अनोखा श्रावण महोत्सव उत्साहात
सरत्या श्रावणाला निरोप देण्यासाठी आवरे येथे अनोखा श्रावण महोत्सव उत्साहात
आवरे : प्रतिनिधी (शंकर पाटील)
श्रावण महिना हा हिंदू कालगणनेतील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात निसर्ग बहरलेला असतो. पावसाची रिमझिम, ऊन-पावसाचा खेळ आणि विविध सण-उत्सवांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, पिठोरी अमावस्या आदी सणांमुळे श्रावणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सरत्या श्रावण महिन्याला निरोप देण्यासाठी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे येथे अनोख्या श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्ये, गायन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भारतीय लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व नियोजनाची धुरा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक ठाकूर सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पालक प्रतिनिधी मिलिंद म्हात्रे, रुचिता पाटील, अश्विनी पाटील, सुष्मिता गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निकिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य, गायन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी श्रावणातील आनंदमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना करून दिली. अशा उत्साहपूर्ण वातावरणात सरत्या श्रावणाला निरोप देत श्रावण महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत