Contact Banner

१ वर्षाच्या बाळातील हृदयातील छिद्र, तर ४ महिन्यांच्या बाळातील रक्तवाहिनीचा दोष कॅथेटरद्वारे यशस्वीपणे बंद- महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

 


महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

१ वर्षाच्या बाळातील हृदयातील छिद्र, तर ४ महिन्यांच्या बाळातील रक्तवाहिनीचा दोष कॅथेटरद्वारे यशस्वीपणे बंद

जळगाव, प्रतिनिधी : जन्मजात हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर चिंतेत असलेल्या दोन कुटुंबांना महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे यशस्वी उपचारानंतर मोठा दिलासा मिळाला. अवघ्या १ वर्षाच्या आणि ४ महिन्यांच्या दोन चिमुकल्यांवर जन्मजात हृदयविकारांवरील कॅथेटरद्वारे मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार यशस्वीपणे करण्यात आले. विशेष म्हणजे, दोन्ही उपचारांसाठी ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता भासली नाही.

१ वर्षाच्या बाळाच्या हृदयातील मोठे छिद्र बंद

पहिल्या प्रकरणात अनीस उल्ला यांच्या १.८ वर्षांच्या मुलगा रुहान याच्या हृदयात जन्मजात दोष आढळून आला. तपासणीनंतर हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यांमधील भिंतीमध्ये असलेले मोठे छिद्र, म्हणजेच अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट (ASD) असल्याचे निदान झाले.

तज्ज्ञ डॉक्टरांनी सखोल तपासणी केल्यानंतर कॅथेटरच्या माध्यमातून विशेष उपकरणाच्या साहाय्याने हे छिद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. छिद्र बंद केल्यानंतर कोणतीही गळती अथवा असामान्य रक्तप्रवाह आढळला नाही. बाळाची हृदयाची कार्यक्षमता सामान्य राहिली असून उपचारानंतर त्याने व्यवस्थित आहार घेण्यास सुरुवात केली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

अवघ्या ४ महिन्यांच्या बाळावर PDA बंद करण्याची प्रक्रिया

दुसऱ्या प्रकरणात संतोष चौधरी यांच्या अवघ्या ४ महिन्यांच्या मुलावर उपचार करण्यात आले. या बाळामध्ये पेटंट डक्टस आर्टेरिओसस (PDA) हा जन्मजात हृदयविकार आढळून आला होता. PDA म्हणजे हृदय व फुफ्फुसांकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील जन्मानंतर बंद होणे अपेक्षित असलेली रक्तवाहिनीची जोड कायम राहणे होय.

तज्ज्ञांनी बाळाची सखोल तपासणी केल्यानंतर कॅथेटरद्वारे विशेष उपकरणाच्या साहाय्याने PDA बंद करण्याची प्रक्रिया केली. ही प्रक्रिया यशस्वी झाली असून उपकरण योग्य ठिकाणी बसवण्यात आले. उपचारानंतर PDA मधून कोणताही असामान्य रक्तप्रवाह शिल्लक राहिला नाही. बाळाची हृदयाची कार्यक्षमता चांगली राहिली असून त्याने व्यवस्थित आहार घेण्यास सुरुवात केली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर बाळाला डिस्चार्ज देण्यात आला.

तज्ज्ञांच्या टीमचे यश

दोन्ही प्रकरणांमध्ये अत्याधुनिक कॅथेटर-आधारित उपचारपद्धतीचा वापर करण्यात आला. त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी टाळता आली आणि चिमुकल्यांवर तुलनेने कमी आक्रमक पद्धतीने उपचार करणे शक्य झाले.

या उपचारांमध्ये डॉक्टरांसोबतच नर्सिंग स्टाफ अनामिका तेंपे, कोमल अडोकर तसेच टेक्निशियन मोहम्मद सिद्दीक यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांमध्ये लवकर निदान आणि योग्य वेळी तज्ज्ञांकडून उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाळाचे वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे, दूध पिताना दम लागणे किंवा जास्त घाम येणे, वारंवार छातीत संसर्ग होणे, लवकर थकणे किंवा डॉक्टरांनी हृदयात मर्मर असल्याचे सांगणे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता बालहृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

महादेव हॉस्पिटलमध्ये झालेल्या या दोन यशस्वी उपचारांमुळे जन्मजात हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या दोन चिमुकल्यांना नव्या आशेची आणि निरोगी भवितव्याची सुरुवात मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.